||श्री विष्णु||

कोळीसरे , जिल्हा रत्नागिरी , कोकण, महाराष्ट्र

प्रस्तुत श्री विष्णूचे देवस्थान कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील श्री गणपतीपुळे या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापासून २१ कि. मी. अंतरावरील कोळिसरे गावात आहे. मंदिरातील मूर्ती अखंड काळ्या पाषाणाची असून मूर्तीची उंची ५ फूट, ५ इंच व रुंदी २७ इंच इतकी आहे. मध्ययुगात ,कोल्हापूर येथील रंकाळा तलावात ही श्रींची मूर्ती पाण्यात सुरक्षेच्या दृष्टीने ठेवली गेली होती. कालांतराने कोणा एका सज्जनास ती श्रींची मूर्ती तेथून दुसरीकडे स्थापित करण्याकरिता स्वप्नात दृष्टांत झाला. त्यानुसार मूर्ती रंकाळ्याहून कोकणात नेत असताना कोळिसरे या ठिकाणी स्थापित झाली. अशी आख्यायिका आहे.

मंदिराच्या परिसरात श्री रत्नेश्वर आणि श्री हनुमान यांची सुंदर मंदिरे आहेत . मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात असलेली घनदाट हिरवी झाडी आणि अखंड वाहणारा पाण्याचा झरा (तीर्थ ) परिसर रम्य करतात . शांत, शुद्ध आणि रम्य अश्या या ठिकाणी दैवी शक्ती आणि निसर्ग यांचा मेळ पाहून मन आनंदमय होऊन जात. आत्मिक सुखाची जणू प्रचितीच मिळते .

मूर्तीचीरचना: अखंड शिळेतून हि मूर्ती त्रिमित वाटावी अशी खोदकाम करण्यात आली आहे. या मूर्तीची संपूर्ण कलाकुसर कोरून झाल्यानंतर ती गुळगुळीत प्रक्रियेमुळे त्या मूर्तीची चकाकी वाढून सौंदर्यात भर पडल्याने अत्यंत विलोभनीय मूर्ती वाटते. या मूर्तीच्या रचनेवरून हि मूर्ती शिलाहारकालीन असावी. कोल्हापूर येथील वास्तू शिल्पांशीखूप साधर्म्य दिसते. शिलाहार घराणे शके ८६२ ते ११३४ ज्ञात इतिहास लेखावरून मिळते. हे घराणे महाराष्ट्रातील सांस्कृतिक व राजकीय इतिहासात भर घालणारे घराणे असून प्रमुख तीन घराण्यात कोल्हापूरचे शिलाहार व उत्तर कोकणातील शिलाहार व दक्षिण कोकणातील शिलाहार घराणे अत्यंत प्रभावी होते. जसे बांधीव मंदिराची सुरुवात गुप्तकाळापासून (४ थे ते ६वे शतक) उत्तर भारतात पहावयास मिळते तसे महाराष्ट्रातील बांधीव मंदिराचा पाया शिलाहार घराण्याचा काळात घातला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. श्री विष्णूची मूर्ती वर म्हटल्याप्रमाणे शिलाहार काळातील असावयाचे कारण मूर्तीची - शरीराची रचना, आयूधाची रचना, अलंकाराची रेलचेल, मूर्ती शास्त्राचा आधार व तांत्रिक कार्य पद्धती होय. मूर्तीतील भावमुद्रा, रेखीव आखणी, सौंदर्याने परीपुर्न्त्वेस पोहचल्याची साक्ष या मूर्तीतून पहावयास मिळते. विष्णूची हि सहपरिवार मूर्ती असून भव्यता दर्शविण्याकरीता त्या त्या देवतेचे कार्य व क्षमता मूर्तीच्या उंचीवरून व्यक्त केली आहे. संकीर्ण प्रकारातील विष्णूची मूर्ती वाटावी अशी समपद स्थानक चतुर्भुज मूर्ती होय. हि मूर्ती एका रथवाहिकेवर(पीठावर-पाटावर) उभी आहे. परंतु पायाखाली कमळाची रचना नाही. प्रलंबबाहू सडपातळ शरीररचना उत्तम प्रकारातील असून पाठ्शिळेत स्तंभावर मकरतोरण किर्तीमुखासह कोरलेले आहे . विष्णु मूर्तीच्या 1/३ आकारात डाव्या हाताखाली लक्ष्मी तर उजव्या हाताखाली गरुड वाहन असून या मूर्तीच्या पेक्षा उंचीच्या चक्रपुरुष व शंखपुरुषाचे (आयुध पुरुषांची) मूर्ती कोरलेल्या आहे. चतुर्भुज मूर्ती उजव्या हातात पद्म (अर्ध उमललेले). उजव्या वरील हातात दंडयुक्त शंख , डाव्या वरील हातात दंडयुक्त चक्र व डाव्या खालच्या हातात षटकोनी दंड, लंबगोलाकार गदा अशी 'पंशचग' आयुध क्रम केशवादी प्रकारातील पहिला 'केशव' होय. कानात चक्र-मकर कुंडले, डोक्यावर करंड मुकुट, उंच उंच होत गेलेला त्यावर आमलक व कळस, मुकुटाच्या मध्यात कीर्तीमुखाची रचना असून मुकुटाच्या मागे स्वतंत्र प्रभामंडळ दाखविण्यात आलेला आहे. अंगावर टपोऱ्या मोत्यांची मण्यांची एकावली माळ, यज्ञोपवित, (हेमसूत्र), बाहुबंध, हातात कंकणे व बहुतेक चारही हाताच्या पाचही बोटांमध्ये अंगठ्यांची रचना असून अंग्ठ्यांमध्ये रत्ने, मोती वापर केल्याचे दिसते. गुडघ्यापर्यंत लोंबणारे मण्यांचे सरव मांडीभोवती साखळ्या असलेली मेखला हे प्रमुख दागिन्यांपैकी एक दागिना होत. इतर देवतामध्ये पायात कोणताही दागिना दिसत नाही परंतु विष्णूच्या पायात दागिने पहावयास मिळतो तसा वाड्मयीन उल्लेख हि मिळतो.